कोविड मधील देवदूत ; ऑक्सीजन बेड ब्लड वॕक्सीन मेडिसिन टेस्टींग ग्रुप...प्राजक्ता शहांच्या प्रयत्नांना यश

पनवेल / वार्ताहर  :-  समोरच्या बिल्डींग मधील आजोबांना, व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने घरी परतावे लागले. दुस-याच दिवशी आजोबा गेले. कोणाच्या मित्राचे पाच नातेवाईकच फटकन दगावले. कोणाला प्लास्माच मिळत नाही तर कोणाला हॉस्पिटल मधे आयसीयू बेड मिळेल का याची चिंता.! कोविडचं थैमान घराघरात चालू झाल्यामूळे, नवी मुंबईकरांनी, मदतीची सिस्टीम सेटअप करण्यासाठी व्हॉट्सअॕप ग्रुप बनवला. गरजूंना शून्य रुपयांत कुठे काय मदत उपलब्ध आहे याची त्वरीत माहिती देण्यासाठी ऑक्सीजन बेड ब्लड वॕक्सीन मेडिसिन टेस्टींग हे नाव ग्रुपला दिले.

अमेरिकेहून परतलेले रोहन परुळेकर व सॉफ्टवेअर इंजिनिअर मोना ठक्कर घरात छोटी छोटी बाळं असूनही, 9 तास ऑफिस सांभाळून, कोविडच्या भयानक परिस्थितीमुळे भांबावलेल्या लोकांना मदत करायला देवासारखे धावून आले. आज कोविड पॉझिटीव्ह असलेले लोक भविष्यात कधी प्लास्मा डोनेट करु शकतील याचा अंदाज घेऊन, दूरदृष्टीने मोना ठक्कर यांनी भविष्यासाठी डेटाबेस तयार करायचा निर्णय घेतला. रोज रात्री 3- 4 पर्यंत जागून मोना ठक्कर, लोकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतात. करंजाडेच्या व्हीआयपी लेडीज ग्रुपच्या अर्चना रसाळ, सई पवार, अंजली मनापूरे व टीम कौटुंबिक जबाबदा-या व स्वत:चा व्यवसाय यशस्वीरित्या पार पाडत, कोविडचा फटका बसलेल्यांसाठी, प्रत्यक्ष फील्डवर उतरल्या. कोणाची हॉस्पिटलची अवास्तव बीलं कमी कर, कुठे वाजवी दरात औषध, इंजेक्शन, व्हेंटीलेटर सामान्य माणसाला मिळावा म्हणून धडपड कर..अशा प्रकारे या महिलांनी प्रयत्नांची शर्थच केली. हो..कारण निर्ढावलेल्या व्यवस्थेविरुद्ध व संधी साधून आपल्याच देशवासियांना वाढीव किमती आकारुन पिळून काढणा-यांविरुद्ध आवाज उठवायला हिम्मत लागते बुवा! 

सर्वात कमाल म्हणजे, तेरणा इंजीनियरिंग कॉलेजचे *प्रो. वैभव जाधव* सर मदतीला धावले ते 200 इंजीनिअरींगच्या विद्यार्थ्यांची फौज घेऊनच. 20-25 मुले प्रत्येक टीम मधे घेण्याचे त्यांनी ठरवले. कुशाग्र बुद्धीमत्तेची ही मुले, नवीन विषयाचा चटकन सखोल अभ्यास करून, शिस्तीत टीमवर्क करतात. बरेच हेल्पलाईन नंबर चुकीचे असल्याने, सर्वांचीच तारांबळ उडाली असताना, ही फास्ट नेटसर्फिंग करणारी टेक्नोसॕवी मुले मदतीला उभी ठाकल्याने, सर्वांनाच या मुलांचा अभिमान वाटत आहे. वेगवेगळ्या पोर्टल वरुन माहिती काढणे, त्याची सत्यता पडताळणे, मग डेटाबेस बनवणे व तातडीने लोकांना फोन करुन कळवणे अशी कामे मुले फार जबाबदारीने करत आहेत. कॉलेजचा अभ्यास, परीक्षा सांभाळून, संपुर्ण दिवस व रात्रभर जागून, लोकांना ऑनलाईन मदत करण्यात ही मुले गढून गेली आहेत. मुलांवर जबाबदारी टाकल्यास, मुले समाजालाच कसा आधार देतात याचे उत्तम उदाहरण बारावीतल्या यश श्रीवास्तव ने घालून दिले.

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिंडेंट हर्मेश तन्ना व सेक्रेटरी कल्पेश परमार  जसा वेळ मिळेल तसे ग्रुप वरुन लोकांच्या अडचणी सोडवतात. लतीफ शेख यांनी पनवेल गुरुद्वाराच्या बरोबरीने लोकांना विनामुल्य ऑक्सीजन सिलिंडर देऊन समाजावर उपकारच केले आहेत.

 संदीप भवसार यांनी जिल्ह्यातील ड्रग इंस्पेक्टर, ड्रग कमिशनर यांची माहिती काढून, लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देऊन, लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रयत्न केले. आयुष बराई, किरण अरोरा, शैलजा कुमकर यांच्या बेड टीम ने आयसीयू बेड, व्हेंटीलेटर बेड व ऑक्सीजन बेडचा डेटाबेस गोळा करायला घेतला.

अदिती जैसवाल यांच्या ब्लड टीमने कोणत्या ब्लड ग्रुपचा प्लास्मा कोणत्या ब्लड ग्रुपला किती दिवसांनी चालतो वगैरे याचा डेटाबेस तयार केला. प्रत्येकाच्या ट्रीटमेंटची सोय लागेपर्यंत पाठपुरावा केल्याने लोकांत दिलासा निर्माण होत आहे. प्रख्यात सायकलपटू प्रवीण सत्यम यांनी या परिस्थितीतले ब्लड डोनेशनचे महत्व लोकांना पटवून देत, ब्लड डोनेशन कँप घेतले. स्वत:च्या आजारपणावर मात करत राजगोपाल यांनी जनसेवेला वाहून घेतले.

वॕक्सीनेशन डिपार्टमेंट मधून रुचीता लोंढे रोजची अपडेटेड माहिती ग्रुप वर देतात. लसींच्या तुटवड्यामुळे प्रथमेश सोमण लोकांना शांतपणे वाट बघण्याचा, स्लॉटसाठी सतत प्रयत्न करण्याचा व पॕनिक न होण्याचा सल्ला देतात. 

स्वप्निल शिंदे यांनी मेडिसिन, ग्रुप मधे शासन प्रमाणित स्त्रोतांकडून औषधे, इंजक्शने मिळावीत, त्यांचा काळाबाजार होऊ नये म्हणून विशेष लक्ष घातले. तसेच त्यांनी सर्व एनएसएस टीमला दिशा देणे, त्यांना काम समजावून सांगणे, पेशंटच्या नातेवाइकांशी आपुलकीचे संबंध ठेवणे, टीम मधील प्रश्न सोडवणे यात कसब दाखवले.

सध्या मृत्यूच तांडव चालू असताना, मुंबई बाहेरच्या चिंतातूर लोकांना, मदत करायला विशाल नागराणी,शालीनी यादव तर दिल्लीहून अभिषेक सिंग यांनी कंबर कसली.  

मृणालिनी निगडे व विजय भंडारी टेस्टिंग ग्रुप मधे आहेत. कोविड पेशंटचे नातेवाईक बरेचदा टेस्टिंग टाळतात. सिंम्प्टम्स असलेले लोक विलगीकरण टाळतात. उमेश थोरात याबाबत जनजागृती  करतात. टेस्टिंग सेंटर, मनुष्यबळ वाढवल्यास फायदा होईल असे त्यांना वाटते.

संपूर्ण टीमने, सर्व प्रकारच्या राजकारणापासून दूर राहून काम करायचे ठरवले आहे. कोविडची झळ टीमला देखील लागली. पण टीम जराही न डगमगता खंबीरपणे उभी आहे. मेडिकल इमर्जंसीची सवय नसताना, बरेच वेळा मदत पोहोचेपोहोचे पर्यंत पेशंट दगावल्याची बातमी येते. दोन क्षण काळजात चर्र होतं. मन गदगदतं. एक टाहो फोडावासा वाटतो. एकमेकांशी फारशी ओळख नसलीली टीम एकमेकांना दिलासा देते. व टीम लौकरच सावरते. 

गरजेपोटी ग्रुप जॉईन केलेले बरेच लोक, आता मात्र अभ्यास करुन, इतर लोकांचे प्रश्न सोडवू लागले आहेत. पुणे, सातारा, मध्यप्रदेश व परदेशातून मदत करण्याची इच्छा दर्शवणारे फोन आल्याने, टीमचा उत्साह दुप्पट होतो आहे.

टीम मधे ब-याच लोकांना मेडिकल बॕकग्राउंड नाही. टीमच्या कामाचे कौतुक वाटून त्यांना गरज पडल्यास अडचणी सोडवायला, मार्गदर्शन करायला सिनियर डॉ. जनार्दन, डॉ सुशांत, डॉ. अरविंद टकले, डॉ. जय भांडारकर, डॉ. समिधा गांधी, डॉ. अंजली टकले, व डॉ. अनंत गोंधळी तयार झाले.

सर्वांनी स्वत:ची प्रकृती उत्तम ठेवावी व प्रत्येकाने आपल्या घराच्या प्रत्येक खिडकीत,गॕलरीत व गच्चीत झाडे लावून ती हिरवीगार करावी अशी टीमची प्रत्येकाला विनंती आहे......असे
संगीता पाटकर यांनी सुचविले.

( अधिक माहितीसाठी 9167112553 )
 
Comments