पनवेलची पाणी पुरवठ्याची समस्या लागणार मार्गी ; २२८ दशलक्ष पाण्याची होणार उपलब्धता


पनवेल / - : न्हावा शेवा टप्पा ३ च्या पाणीपुरवठा योनजेचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले.या योजनेमुळे पनवेलकरांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न बहुतांशी नष्ट होणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेलला सुमारे २२८ दशलक्ष पाण्याची उपलब्धता होणार असल्याने पनवेलकरांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे. 
       
 या कामाचा कालावधी ३०महिन्यांचा असल्याने पुढील दोन वर्षांनंतर योजनेचे काम पूर्ण झाल्यावर पनवेलकरांना पाणी प्रश्न भेडसावणार नाही .मागील कित्येक वर्षापासून पनवेलला पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये पनवेल शहर ,२९ गावे आदींसह पालिका क्षेत्रातील पाच सिडको नोडचा समावेश आहे. सध्याच्या घडीला पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ७० ते ८० एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे.या प्रकल्पामुळे पालिकेला सुमारे १०० एमएलडी पाणी मिळणार असल्याने पनवेलची पाण्याची समस्या मिटणार आहे. 

पनवेल पालिकेमध्ये ४०८ कोटी रुपयांच्या योजनेमुळे २२८दश लक्ष लीटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून होणार आहे.या कामानं पनवेल पालिकेला शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे. तर एमएमआरडीए क्षेत्राला १९ तर जेएनपीटी बंदराला ४० एमएलडी तर सिडको मंडळाच्या क्षेत्राला ६९ एमएलडी पाणी मिळणार आहे. १६१ कोटी रुपये एमजेपी पंपींग मशीनरी व इतर कामांसाठी खर्च करणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडको महानगरपालिका, एमजेपी ,एमआयडीसी आदी विविध आस्थापना पाणीपुरवठा करून देखील याठिकाणी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.पालिका क्षेत्रात अमृत योजने अंतर्गत हि कामे केली जात आहेत. २५ किलोमीटर लांबीच्या विविध जलवाहिन्यांमध्ये ९६५ व १९५०  मीलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने पनवेल व इतर क्षेत्रात एमजेपी पाणी पुरवठा करणार आहे.
        
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावठाणात ८ एमएलडी , पनवेल शहरात ५ ते ६ एमएलडी तर पालिका क्षेत्रातील सिडको नोड मध्ये सुमारे ७० ते ८० एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे. यापैकी सध्याच्या घडीला पनवेल शहर व २९ गावठाणात पनवेल महानगरपालिका पाणीपुरवठा करीत आहे. या ठिकाणी १४ एमएलडी पाण्याचा तुटवडा भासत असल्याची माहीती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.
Comments