एमडी अमली पदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक...
एमडी अमली पदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक...


पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः सुमारे 32 कोटी रुपयांच्या एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेला संशयीत आरोपी सहा महिन्यांपासून फरार होता. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने तळोजा येथून अटक केली. अटकेवेळी आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसी उर्फ छोटू कमर अहमद अन्सारी (वय 27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तळोजा फेज-2 येथील साईधाम सोसायटीत भाड्याने राहत होता. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा, भिवंडी घटक-2 मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार, मागील वर्षी कोनगाव पोलीस ठाण्यात एमडी अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात वसी हा फरार आरोपी होता. या प्रकरणात सुमारे 32 कोटी रुपयांचा एमडी जप्त करण्यात आला होता. 

तपासादरम्यान अमलीपदार्थाच्या विक्री व वितरणामध्ये त्याची भूमिका असल्याचे निष्पन्न झाले होते.फरारीनंतर वसी वारंवार ठिकाणे बदलत असल्याची माहिती तांत्रिक तपासातून समोर आली होती. नेरूळ, तळोजा, डायघर आणि अन्य परिसरात त्याच्या हालचाली सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. सेक्टर-19 येथील साईधाम सोसायटीमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडतीदरम्यान आरोपीकडून सुमारे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 900 रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात वसी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले करीत आहेत. आरोपीने पिस्तूल कुठून आणि कोणाकडून मिळविले याचा तपास सुरू असून न्यायालयाने त्याला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Comments