पनवेल महानगरपालिकेमार्फत सोमवारी ‘महिला सक्षमीकरण व बचत गट उत्पादन मेळाव्याचे’ आयोजन
पनवेल / दि.12 : – पनवेल महापालिका क्षेत्रातील महिलांना स्वावलंबी व सशक्त बनवण्यासाठी , व्यवसायिक व सामाजिक कौशल्य वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिला सक्षमीकरण व बचत गट उत्पादन मेळावा’ सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यांतर्गत बचत गट व्यवस्थापन याविषयावरती व्यवसाय वृध्दी मार्गदर्शक तज्ज्ञ डॉ. पुनम हुद्दार व कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. सरस्वती कदम यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाद्वारे महिलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळून त्यांच्या बचत गटांच्या उपक्रमांना चैतन्य मिळणार आहे. बचत गट व्यवस्थापन, उत्पादकता वाढ, विपणन कौशल्य, तसेच आर्थिक स्वावलंबनाबाबत महिलांना मार्गदर्शन मिळणार आहे. याचबरोबर महिलांविषयक कायद्यांविषयी माहिती मिळणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम 'श्री तिथं सौ' हा कविता, किस्से व गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम चेतना भट, संगीतकार अमीर हडकर, गीतकार मंदार चोळकर, पार्श्वगायक स्वप्निल गोडबोले, मयुरा परांजपे, निवेदक परेश दाभोळकर हे उपस्थितांचे मनोरंजन करणार आहेत.
चौकट
मेळाव्यामध्ये महिलांना मिळणारे महत्त्वाचे लाभ :
कायद्याविषयी व उद्यमशीलतेविषयी माहिती
बचत गट उत्पादनांची निर्मिती, गुणवत्ता व विपणन कौशल्य आर्थिक शाश्वततेकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन
चौकट
कार्यक्रम कधी व कुठे
दिनांक : १५ डिसेंबर २०२५
वेळ : सकाळी 11.00 ते5.00 वाजता
स्थळ : आद्य कृांतिवीर वासुदेव बळवंत फडकें नाट्यगृह, पनवेल