पनवेल तालुक्यातील गाढेश्वर,देहरंग,मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी
पनवेल वैभव / दि.6 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्वर, देहरंग, मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा, कुंडी धबधबा, हरीग्राम नदीपात्र, धोदाणी, चिंध्रण, महोदर, शांतीवन नदीपात्र, माची प्रबख व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदई, नेवाळी धबधबा, गाढी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत. सदर ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशेष शाखा रश्मी नांदेडकर यांनी विशेष आदेशान्वये केली आहे.
सदर परिसरामध्ये पावसाळ्यात दर शनिवार व रविवार या दिवशी सुमारे 300 ते 400 व गाढेश्वर धरण परिसरात सुमारे 4000 ते 5000 तरुण-तरुणी कुटुंबांसह व मित्रांसह फिरण्यास येतात. परंतु अनेक पर्यटक हे दारु प्यायलेले असतात. ते धरणातून येणार्या नदी नाल्याच्या पाण्यात उतरतात. अनेकांना येथील पाण्याचा अंदाज नसल्याने पर्यटक गाफील असतात व अचानक पाण्याचा लोंढा वाढून त्यात ते पर्यटक वाहून जावून बुडून मृत्यू होतात. या अनेक घटना पनवेल तालुका पोलीस ठाणे तसेच खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असल्याने सदर ठिकाणी यावर्षी सुद्धा पावसाळी पर्यटन स्थळांचे ठिकाणी पर्यटकांना भेटी देण्याबाबत प्रतिबंधित करण्याचे आदेश त्यांनी काढले आहे.
कोट
पर्यटकांनी वर्षा सहलीसाठी पोलीस खात्यामार्फत जाहीर केलेल्या ठिकाणी येवू नये व आपला मौलिक जीव वाचवावा. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या फलकांवरील सुचनांचे पर्यटकांनी पालन करावे. ः वपोनि गजानन घाडगे
फोटो ः गजानन घाडगे