अबोली महिला रिक्षा चालक संघटनेच्या माध्यमातून महिलांसाठी मोलाचे कार्य..
संघटनेचा वर्धापन दिन व महिला दिन उत्साहात साजरा
पनवेल/प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील पहिली महिला रिक्षा चालकांची संघटना म्हणून ओळख मिळवलेल्या अबोली महिला रिक्षा चालक संघटनेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या कार्याचा महिलांकडून विशेष गौरव करण्यात आला.
सुमारे आठ वर्षांपूर्वी महिला दिनाचे औचित्य साधून संतोष भगत यांनी अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची स्थापना केली. महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि समाजात सन्मानाने उभे राहण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. संतोष भगत यांनी अथक परिश्रम घेऊन ही संघटना वाढविली असून आज नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरात संघटनेचे जाळे विस्तारले आहे.
दरवर्षी संघटनेचा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिन असा दुग्धशर्करा योग साजरा केला जातो. यावर्षीही कोपरखैरणे येथे संघटनेच्या महिला सदस्यांना संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या वतीने साडीवाटप करण्यात आले. त्यानंतर पनवेल येथेही संघटनेतील महिला रिक्षा चालकांना साडी वाटप करून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुलोचना भगत, कोपरखैरणे उपाध्यक्ष दिशा वाघमारे, तसेच पनवेल येथील कार्यक्रमासाठी खजिनदार ललिता राऊत, पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अबोली महिला रिक्षा चालक संघटनेमुळे आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली. आज आम्ही रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहोत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संतोष भगत सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगाराची नवी दिशा मिळाली असून, समाजात महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी उदाहरण म्हणून अबोली महिला रिक्षा चालक संघटना पुढे येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
संतोष भगत यांनी आम्हाला कोरोना काळात खूप मदत केली. तसेच कुठेही काही समस्या आली ते तातडीने हजर राहतात. संतोष भगत यांच्यामुळे रिक्षा व्यवसाय करणे आम्हाला सोपे झाले आहे. त्यामुळे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांचे आम्ही कोपरखैरणे येथील संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.
पनवेल येथील कार्यक्रमात खजिनदार ललिता राऊत यांनी सांगितले की, संतोष भगत यांच्यासारखे संस्थापक अध्यक्ष आम्हाला लाभले याचा खरंच आम्हाला अभिमान आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली अन्नधान्याची मदत ही प्रत्येक कुटूंबासाठी महत्वाची होती. ज्या महिला येवू शकल्या नाहीत त्या महिलांच्या घरपोच अन्नधान्य पोहचविण्यात आले. आज आठ वर्षे ते सतत ही संघटनावाढीसाठी प्रयत्न करत आहेत. आज पनवेल मधील सर्व अबोली महिला रिक्षा चालक सदस्यांकडून त्यांचे आभार मानते.