गणपतीचे दर्शन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात साडे सहा लाखांची घरफोडी ...


पनवेल, दि. १७ (वार्ताहर) ः  मित्रांच्या घरी गणपतीचे दर्शन करण्यासाठी गेलेल्या सीबीडी सेक्टर -4 मधील एका व्यावसायीकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यांच्या घरातील तब्बल 6 लाख रुपयांची रोख रक्कम व 60 हजार रुपये किंमीतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे . सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

सीबीडी सेक्टर -4 मधील सरगम अपार्टमेंटमध्ये रहाणारे डायाभाई मणवर यांचे सीबीडी सेक्टर -8 भागात कापड विक्रीचे दुकान आहे , डायाभाई हे कुटुंबासह वाशी व कोपरखैरणे येथील मित्रांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते . या कालावधीत त्यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधुन त्यांच्या घराचे टाळे तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला . त्यानंतर चोरट्यांनी डायाभाई यांनी कपाटात ठेवलेली 6 लाखांची रोख रक्कम व 60 हजार रुपये किंमतीचे दागिने असा तब्बल 6 लाख 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.  दरम्यान, गणपतीचे दर्शन घेऊन डायाभाई आपल्या घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . त्यानंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली . त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे .
Comments