कामोठे वसाहतीमधील पाणी प्रश्‍नावरुन भाजप नगरसेवक आक्रमक ; आ.प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर काढणार मोर्चा
आ.प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर काढणार मोर्चा

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः कामोठे वसाहतीमधील पाण्याचा प्रश्‍न चांगलाच भेडसावत चालला असून या वसाहतीला गरज असलेल्या पाणी पुरवठ्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. या पाणी प्रश्‍नावरुन आज भाजपा नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर व सहकारी कामोठे वसाहतीमधील सिडको कार्यालयात चांगलेच आक्रमक झाले होते. पाण्याचा प्रश्‍न तातडीने न सोडविल्यास आ.प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच मंत्रालयावर सुद्धा याबाबत धडक मारण्यात येईल असा इशारा नगरसेवक विकास घरत यांनी यावेळी दिला आहे.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34, सेक्टर 6, सेक्टर 18 तसेच इतर परिसरात गेल्या काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न चांगलाच भेडसावत चालला आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लोकांना पाणी विकत घेवून प्यावे लागत आहे. सिडकोने वसाहत उभारताना नागरी सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक असतानाही आवश्यक तेवढे पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या वसाहतीला 40 एमएलडी पाण्याची गरज असताना सध्या फक्त 30 ते 32 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी पूर्णतः सिडको जबाबदार असल्याचे मत नगरसेवक विकास घरत यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात आज नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेतृत्व हर्षवर्धन पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम व त्यांच्या सहकार्‍यांनी सेक्टर 34, सेक्टर 6, सेक्टर 18 मधील महिला व नागरिक हे या पाण्याच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी सिडको कार्यालयात धाव घेतली असता तेथे एकही अधिकारी आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांचा संताप अजूनच तीव्र झाला आहे. येथील अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचा सुद्धा नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आगामी काळात सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास सिडकोविरुद्ध धडक मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

कोट
कामोठे वसाहत चोहोबाजूने पसरत असून आवास योजना व इतर सोसायट्या मोठ्या प्रमाणात येथे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी समस्या ही आगामी काळात भेडसावणारी असून यासाठी 11 नगरसेवकांनी वारंवार सिडकोकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून सुद्धा सिडको या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना त्यांची जागा दाखविण्याची आता गरज आहे.  ः नगरसेवक विकास घरत


फोटो ः सिडको कार्यालयात संताप व्यक्त करताना नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर व इतर सहकारी.
Comments