वादविवाद न करता दिबांच्या नावासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरा ; बबनदादा पाटील


"आमचा निषेध केला तरीही विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव" -  जिल्हाप्रमुख शिरीष घरत


पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी एकीकडे स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक होताना दिसत आहे तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या नावासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीचे आगरी नेते ठाम असल्याचं पहायला मिळतंय. राज्यशासनाने विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव संमत करून केंद्राकडे पाठवला असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आंदोलकांना राज्यशासनाची कवाडं बंद झाली आहेत. आता प्रकल्पग्रस्त कृती समितीला दिबांच्या नावासाठी केंद्राचे दार ठोठावावे लागणार आहे. त्यामुळे येथील भाजपचे नेते मंडळी राजकारण करून प्रकल्पग्रस्तांना भडकवित आहे, असले राजकारण त्यांनी सोडावे, आणि राज्य सरकार सोडून आता केंद्र सरकारच्या दारात लढावे, असे आवाहन शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी शिरीष घरत आणि बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. दिनांक १९ जून २०२१ रोजी पोलीस उपायुक्तालयाला शिवसैनिकांनी घेराव घातला, यावेळी शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहिले होते. 

१० जून च्या साखळी आंदोलनानंतर प्रकल्पग्रस्त येत्या २४ जूनला सिडकोला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. परंतु वारंवार अश्या आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांना भडकाविणाऱ्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांना घेवून पंतप्रधानांची भेट घेत केंद्र सरकारकडे दिबांच्या नावासाठी हट्ट धरावा, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिला आहे. 
भाजपचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी आव्हान दिले की जर राज्य सरकारने दिबांचे नाव नाही दिले तर आम्ही केंद्रातून नाव आणू, या त्यांच्या आव्हानाला आम्ही उत्तर देतो की, जर केंद्र सरकारच्या माध्यमातून विमानतळाला दिबांचे नाव देण्यात प्रकल्पग्रस्त आंदोलकांच्या जीवावर भाजपच्या महेश बालदीना यश आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, असेही बबनदादा पाटील म्हणाले आहेत.

इतके सर्व प्रकार होवूनही रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी वादविवाद न करता दिबांच्या नावासाठी पंतप्रधानांकडे आग्रह धरा असा सल्ला देत आम्ही स्थानिक शिवसैनिक विमानतळ नमकरणाबाबत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करू असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले. 

यावरून एकच लक्षात येत आहे की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांची असलेली ख्याती ही संपूर्ण देशासह जगात अभ्यासपूर्ण अशी आहे. आजही देशातील इतर राज्यात गेल्यानंतर महाराष्ट्राची ओळख तेथील स्थानिक माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची देत असतो, आणि त्याची प्रचिती इतर पक्षांतील मात्तबर नेत्यांनाही आली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना शिवसेनेच्या वतीने सावध भूमिका घेवून आपले हित पाहिले नंतर राजकारण असा सल्ला देण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.

Comments