कामगार क्षेत्रातील एक अनभिषिक्त व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र घरत....
साप्ताहिक अभेद्य प्रहार च्या "महेन्द्र घरत जन्मदिन" विशेषांकाचे प्रकाशन
पनवेल :- न्यू मेरी टाईम जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि इंटरनॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा साप्ताहिक अभेद्य प्रहार चा विशेषांक प्रकाशन सोहळा 1 जून रोजी साधेपणाने संपन्न झाला. यावेळी साप्ताहिक अभेद्य प्रहारचे संपादक प्रकाश म्हात्रे, उपसंपादक शंकर वायदंडे यांच्यासमवेत सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे, विवेक पाटील, दैनिक सामना चे  प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार संजय कदम उपस्थित होते.
       कोरोना विषाणूची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी या लाटेमध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाण भयंकर होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने ग्रामीण विभागात शिरकाव केल्याने गंभीर परिस्थिती ओढवली. या पार्श्वभूमीवर कामगार नेते महेंद्र घरत यांनी वाढदिवसाचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले. कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी आखून दिलेल्या तमाम निकषांचे काटेकोर पालन करत अत्यंत साधेपणाने महेंद्र घरत यांनी वाढदिवस साजरा केला.
      यावेळी महेंद्र घरत यांच्या माध्यमातून कोरोना कालखंडामध्ये करण्यात आलेल्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे बाबत त्यांनी विस्तृतपणे विवेचन केले. ते म्हणाले की कामगार संघटनांच्या माध्यमातून आज आमची टीम 24 तास तैनात असते. यात रुग्णवाहिका आहेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासाठी आमचे स्वयंसेवक आहेत, रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी तज्ञ मंडळी देखील आहेत. या व्यतिरिक्त आम्ही गरीब गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करत आहोत. त्यासाठी दुर्गम आदिवासी वाड्यांवरती जाऊन त्यांना हवी ती मदत करत आहोत.
      यावेळी महेंद्र घरत यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा स्ट्रेस मॅनेजमेंट या मुद्द्याचे बाबत सूतोवाच केले. ते म्हणाले की एकूणच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असते. लॉकडाऊन मुळे व्यावसायिक, नोकरदार,स्वयम रोजगार कर्ते,श्रमजीवी,शासकीय अधिकारी, डॉक्टर,पोलीस या साऱ्यांवर प्रचंड ताण आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये आरोग्य सुदृढ ठेवणे आणि सर्व्हाईव्ह करणे ही काळाची गरज आहे.त्यामुळे प्रत्येकाने स्ट्रेस मॅनेजमेंट चे कसब अंगी भिनवले पाहिजे.
Comments