दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू ; गोवर्धन डाऊर यांचा आक्रमक इशारा...
      
पनवेल :-  दापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोवर्धन नामदेव डाऊर यांनी विमानतळाच्या नामकरण वादाबाबत आपली भूमिका मांडत असताना आक्रमकपणे राज्य सरकारला ठासून सांगितले आहे की,दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू.
       
नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली नसल्या कारणामुळे प्रकल्पग्रस्त बांधव आक्रमक झाले आहेत. गुरुवार दिनांक १० जून रोजी मानवी साखळी आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी राज्य शासनाला गर्भित इशारा दिला आहे. ये तो सिर्फ झाकी है २४ जून की टक्कर अभी बाकी है... असे म्हणत प्रकल्पग्रस्त बांधव आणि भूमिपुत्रांनी २४ जून रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी बाह्या सरसावल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने 
गोवर्धन डाऊर यांच्याशी चर्चा केली असता पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढाई देऊ अशी भूमिका मांडली.
          गोवर्धन डाऊर म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव हे दि बा पाटील यांचेच दिले पाहिजे. इथल्या भुमिपुत्राला आणि प्रकल्पग्रस्त बांधवाला त्यांनीच योग्य न्याय मिळवून दिला आहे. आज हे विमानतळ आमच्या हक्काच्या जमिनींवर उभे राहात आहे. या जमिनी आमच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. या जमिनींवर जर विमानतळ उभा राहत असेल तर त्याला आमच्या प्राणप्रिय नेत्याचेच नाव दिले गेले पाहिजे. जेव्हा एखाद्या घरात मूल जन्मते तेव्हा त्या मुलाच्या नावापुढे त्याच्या जन्मदात्याचे नाव लागते. त्यामुळे लोकनेते दि बा पाटील यांनी ज्या प्रकल्पग्रस्तांना सुखा समाधानाचे आणि समृद्धीचे जीवन दिले त्यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकल्पाला देता येईल, पण नवी मुंबई विमानतळाला मात्र पाटील साहेबांचे नाव दिले पाहिजे.
       गोवर्धन डाऊर पुढे म्हणाले की, सर्वपक्षीय कृती संघर्ष समितीच्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सुरुवातीला सर्वपक्षीय नेते एकत्र होते व विमानतळाला दि. बा.पाटील यांचेच नाव दिले पाहिजे यासाठी ठाम होते. त्यानंतर कुठेतरी माशी शिंकली, मध्यंतरी कुठलीतरी चक्रे फिरली आणि महाविकासआघाडी मधील नेत्यांनी रातोरात त्यांची भूमिका बदलली. अशाप्रकारे भूमिका बदल करणाऱ्यांचा मी निषेध करतो. आज कुठल्या तरी प्रलोभनांना भुलून या मंडळींनी भूमिका बदलली असली तरीसुद्धा त्यांनी एक समाजबांधव म्हणून दि बा पाटील यांच्या नावासाठी आग्रही राहणे गरजेचे होते.
     गोवर्धन डाऊर  मानवी साखळी आंदोलनामधील त्यांचे योगदान विशद करताना म्हणाले की, आम्ही १८ गाव प्रकल्पग्रस्त समितीने मिळून लोकनेते दि बा पाटील यांचे भव्य दिव्य असे नाव मानवी साखळीच्या स्वरूपामध्ये केले व त्याचे ड्रोन कॅमेरा मार्फत शूटिंग करून विमानतळाला आम्ही पाटील साहेब यांचे नाव देण्याची एकप्रकारे घोषणा केली. यासाठी क्रीडा क्षेत्रातील पारंगत तरुणांनी एक ढंगाचे पोषाख घालून अत्यंत मेहनतीने भर पावसात उभे राहून ही मानवी साखळी यशस्वी करून दाखवली. ते पुढे म्हणाले की दि.बा. पाटील हे संपूर्ण राज्याचे नेते होते. त्यांच्यामुळेच स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला, त्यांच्या आग्रहामुळेच ओबीसी समाजाची जनगणना झाली, इतकेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते हिरीरीने सहभागी झाले होते व त्यात त्यांना कारावास देखील भोगावा लागला. आज तरुण वर्ग देखील मोठ्या इर्षेने या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. मी राज्य शासनाला विनंती करेन की त्यांनी त्यांच्या निर्णयाचे बाबत विचार करून तो मागे घ्यावा व नवी मुंबई विमानतळाला लोकनेते माजी खासदार दि बा पाटील यांचेच नाव दयावे. असे जर होणार नसेल तर आम्ही विमानतळाचे काम होऊ देणार नाही.
Comments