अनैतिक संबंधांच्या संशयावरून इसमाची हत्या
अनैतिक संबंधांच्या संशयावरून इसमाची हत्या

पनवेल दि.20 (संजय कदम)- आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असावेत या संशयावरून पतीने आपल्या दोन मित्रांच्या साथीने एका इसमाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील घोट गाव परिसरात घडली असून त्यामुळे खळबळ उडाली होती.   आरोपी राहूल दान विलोग (वय-20, रा.-घोटचाळ) याचा आपल्या पत्नीचे मयत दिनेश यादव (वय-35) याच्यासोबत अनैतिक संबंध असावेत असा त्याच्याबाबत त्याला संशय आल्याने त्याने आपले मित्र रतिश बराईक व राजू लोहरा यांच्याशी आपसात संगनमत करून त्यांनी दिनेश यादव याला सोबत घेऊन एकत्र दारूचे सेवन केले. त्यानंतर त्यांनी त्याचा गळा दाबून त्याच्या गुप्तांगास मारहाण करून व्हिव्हिएफ कंपनीच्या पाठीमागील तलावाच्या ठिकाणी त्याला पाण्यात बुडवून त्याचा मृतदेह पाण्याबाहेर येऊ नये म्हणून त्याच्या उजव्या पायाच्या मांडीस दगडमातीचा मोठा ढेकूळ बांधून त्याला जीवेठार मारले. याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील याच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय नाळे, सपोनि विशाल राजवाडे, पोलिस उपनिरीक्षक अस्लम पटेल व पथकाने याबाबत अधिक शोध घेतला असता या खूनाचा उलगडा झाला असून याप्रकऱणी राहूल विलोग याला अटक करण्यात आली आहे.
Comments