पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे "संघर्षवादी महिलांचा सन्मान "....

पनवेल /(प्रतिनिधी):   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने संघर्षवादी महिलांचा आगळावेगळा सन्मान सोहळा सोमवार दि.८ मार्च रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.     
        
जीवनात संघर्ष करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन समाजात आदर्शवत काम करणाऱ्या आणि प्रसिध्दीच्या झोतात नसलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.      कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या नियम, अटी व शर्तींचे पालन करुन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सत्कारमूर्तींच्या घरी जाऊन आगळावेगळा असा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन जागतिक महिला दिनी आयोजित कार्यक्रमासंबंधीची माहिती दिली. 
             
यावेळी जेष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दिपक घोसाळकर, सचिव तथा दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मयूर तांबडे, खजिनदार तथा आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील, प्रसिध्दीप्रमुख तथा दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी नितीन देशमुख, दैनिक मुंबई चौफेरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, दैनिक किल्ले रायगडचे प्रतिनिधी प्रदिप वालेकर, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे, वतन कर्नाळाचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोपी आदी उपस्थित होते.
 
यावेळी श्रीमती 'श्रध्दा विरेन पटेल ' या होतकरु महिलेला त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमती श्रध्दा पटेल या आपल्या पतीच्या निधनानंतर कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी घरी मास्क तयार करुन विकत असून आलेल्या पैशातून आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करत आहेत, त्या सेक्टर ८ मध्ये राहतात. 
 'श्रीमती सुगंधा बाळू धोत्रे' या रिक्षा चालक आहेत, या सकाळी नोकरीकरुन संध्याकाळी रिक्षा चालवून आलेल्या पैशातून घरखर्च चालवितात. त्यांच्या पतीच्या आकस्मित निधनानंतर त्या आपल्या मुलासमवेत खांदा काॕलनी येथे त्यांच्या आईकडे  राहतात. 

तसेच 'श्रीमती उज्वला कुंडलिक कारंडे' या कळंबोली फायर ब्रिगेड जवळ चप्पल विक्रीचा व्यवसाय करतात. पतीराजाच्या निधनाने कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर आल्याने त्या कळंबोली येथील फायर ब्रिगेडजवळील फूटपाथवर पूर्वपार असलेला चर्मकारितेचा व्यवसाय करत आहेत. त्या कळंबोली येथे वास्तव्यास आहेत.


Comments